Wednesday 15 July 2015

बाजीराव मस्तानी

बाजीराव मस्तानी

सध्या बाजीराव मस्तानी या सिनेमाची खूप चर्चा चालू आहे . खर तर खूप बरे वाटले होते हा असा चित्रपट येणार आहे असे कळल्यावर , खरच बाजीरावांचे कार्य आणि इतर पेशव्यांचे कार्य दुर्लक्षित आहे महाराष्ट्राबाहेर काय महाराष्ट्रातील लोकांना सुद्धा पेशवे म्हणजे काय आणि काय चीज होते हे माहित नाही . त्यांनी मराठी प्रांतासाठी केलेले कार्य , आधीच्या मराठी साम्राज्याच्या कितेक पटीने वाढवलेल्या सीमा , दिल्लीची केलेली सुरक्षा ( महाराष्ट्राने ) हे सर्व काळाच्या ओघात बुजून गेले. जवळजवळ दीडशे वर्षे पेशव्यांनी सत्ता सांभाळली आहे. आणि आज महाराष्ट्रातल्या लोकांना पेशवे म्हणाले कि दोनच गोष्टी आठवतात मस्तानी आणि पानिपत …. झेप झेप तर काका मला वाचवा …. पेशवाई या पलीकडेहि होती… आहे.

आजच वरील उल्लेखलेल्या चित्रपटातील काही व्यक्तिरेखांचे फोटो एका वर्तमानपत्राच्या साईट वर बघायला मिळाले .  त्यात बाजीराव पेशव्यांची प्रथम पत्नी काशीबाई हिची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीचा फोटो होता. आणि उल्लेख असा होता The Sexiest Kashibai Ever …. लाज वाटली हे वाचून … जवळ भारतावर सत्ता होती अशा थोर पेशव्यांच्या पत्नी बद्दल अशी कॉमेंट …. का … काशीबाई  या व्यक्तीमधील चांगले गुण नवरा युद्धावर बाहेर असताना सांभाळावे लागणारे प्रचंड साम्राज्य तिचा तो आवाका… तीच नऊवारी साडीतले शालीन सौंदर्य हे सगळे sexiest … का … मला तरी हे बिलकुल सहन होत नाहीये … आणि चित्रपटाच्या कडून असलेल्या अपेक्षा सुद्धा मावळल्या आहेत …. बहुतेक स्वता:ची पोतडी भरायला बाजीराव मस्तानी यांचे  फक्त प्रेमप्रकरण दाखवायला सुद्धा हे लोकं कमी करणार नाहीत… आणि आम्ही मराठी माणसे … ३०० -४०० रुपयांचे तिकीट काढून हे बघायला जाणार आणि बाजीराव पेशवेना मस्तानी शिवाय काही करण्यासारखे नव्हते असा मूर्ख समज करून घेणार. 

Tuesday 30 June 2015

आपलेपण

आपलेपण

मोठा रुंद रस्ता…. त्याला लागून फुटपाथ…. वाहनांची सतत रहदारी …. हे सगळ सग्गळ होत… पण आज राधिकाला कशाचीच जाणीव नव्हती….  तिच्या मनात खूप गोंधळ माजला होता … विचारांचा , अपेक्षांचा … काहीही काळात नव्हते चूक कि बरोबर …. मनात वादळ आणि त्याचे पाणी मात्र डोळ्यात होते ….

नुकताच नवीन घेतलेला टू बीएचके घर , चार चाकी गाडी, चांगला निर्व्यसनी नवरा, लाघवी मुलगा, सासू सासरे … असे सगळे कॉलम व्यवस्थित भरणारे तिचे जीवन मग नक्की काय खुपत होत तिला… का ती एवढी व्याकूळ … अस्वस्थ…. ??? समाजमान्यतेप्रमाणे सगळे ठीकच होते … आता प्रत्येक घरात काहीनाकाही खुडबुड सुरु असतेच कि … एवढे मोडून पडण्याइतके का दुखावलो आहे आपण….

आज सकाळचीच गोष्ट …. आपण हल्ली स्टडी रूमला जातोय अभ्यासाला …. एखादी चांगली नोकरी लागावी … आणि आपली आर्थिक खुंटी बळकट असावी … थोडीशी आपली हौस … माहेरची जबाबदारी …. आणि नवर्याला मदत असे सगळे होईल …. नऊ ला निघावे अशा बेताने सर्व आवरत आणलेले …. नवऱ्याला फक्त सांगितले कि जरा अंथरूण काढ रे… म्हणजे एकत्रच निघू … त्यात काय बिनसले काही कळलेच नाही …. अंथरून काढले पण प्रचंड चिडचिड त्याचीही आणि आपलीही…वर उद्धार हि … सतत उलट बोलायचे … किरकिर करायची … अजिबात शांतता नाही मुलालापण असेच वळण लागले आहे हिच्या मुले वै. वै.

खरतर खूपच छोटी गोष्ट दोघांसाठी सुद्धा… पण कुणीच सांभाळून घेतले नाही …. फक्त दुस्वास केला एकमेकांचा …. एका खरचटण्याने फक्त खपली निघाली होती …. कायम, सतत जाणवते  घरात …. कायम ३ वि १ असाच सामना आहे… सतत फक्त ऐकायचे आहे …. सासू … सासरे … नवरा … कधी कधी माहेरही … मला काय वाटतंय याचे कोणालाही काहीही पडलेली नाही…. माझी  इच्छा , हौस , विचार यांना घरात काही स्थान नाही … कामे करायला हवी… भांडी घासायला हवी … स्वयंपाक आटपायला हवा …रात्री साडे आठला जेवण… साडेदहाला झोपेत असायला हवे… घरचा सणवार अगदी  नियमाने व्हायला हवा (स्वनिश्चीत)… कपडे…  साडी…  ब्लाउज ची स्टाईल सुद्धा यांच्या घराण्याला शोभेशी ….  मुलगा डावरा  असला तरी त्याने उजव्याच हाताने लिहायला हवे… इव्हन राजकीय मते सुद्धा यांसारखीच असायला हवी… वै. वै. हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी मारुतीची शेपूट होत्या….

मला काय हवाय हा विचार हल्ली मीही करतच नाही  …. पण खात्री होती आपण चुकत असू … वाईट नक्कीच नाही…  बोलताना थोडे फार सुटत असू पण मनात वाईट व्हावे अशी इच्छा नाही… ४-५ वर्षे एकत्र राहिल्यावार थोडे तरी मन कळावे अशी इच्छा …. काय आहोत आपण नवर्यासाठी , सासूसाठी , सासर्यासाठी…. एक बिन पगारी मोलकरीण कि जास्त का सून का मुलगी …. डोक पार भंजाळलेय… एकदा वाटले जाऊदे या अपेक्षांचा बोश घेऊन जगण्यापेक्षा आपले जगू आपण नवर्याला सांगू lets stop  now …. जाता येईल आपल्याला श्लोक ला घेऊन …. असे जगू आपण आणि तो एकटे … का नशीब म्हणून परत तिथेच घुसमटत राहायचे…. सगळेच अवघड… माहेरचे तर कोण आहे खंबीर पाठींबा द्यायला माझ्या काळजीने सासरी जाब विचारायला … खरतर नाहीच खमके कोणी ….

बराच वेळ झाला चालतोय आपण … पाय दुखत आहेत खूप … गाडी कुठे लावली आहे आपण … काही लक्षात येईना… गोंधळून बसलोय  … न मागता टपरीवरच्या आजींनी समोर  एक अर्धा कप चहा ठेवलाय …. आणि अतिशय स्नेहल नजरेने सांगितले काळजी करू नको बाळ… थोडीशी कड काढ सगळे निट होईल…. चहा पोटात गेल्यावर अचानकच खूपच शांत, आश्वस्त वाटू लागलय… आत्ता ट्यूब पेटतीये …. लक्षात येतेय काही … हेच हवाय मला थोडीशी उबदार आपुलकी…

                                                                                                                                                                                                                                                                 फोटो : महाजालावरून साभार
                                                                

Monday 25 May 2015

वांग, लेक आणि हॉस्पिटल

वांग, लेक आणि हॉस्पिटल

त्यादिवशी बाईचे प्रेमपत्र आलेच माझ्या हातात …. :-) लेकीच्या शाळेतल्या बाईचे मिस् चे …. आमच्याकडे बाकी कसलेही प्रेमपत्र किंवा पत्रातील प्रेम सापडायची तिळमात्र शक्यता नाही… अरसिक नवरा दुसरे काय … मी त्याला म्हणतीये बाबा मला नाही लिहिलेस तरी चालेल पण कोणाला तरी लिही … पण हा बाबा फारच संत -सज्जन मिळाला काही एक्साईटमेंट नाहीच आयुष्यात  … बर लेटर … तिच्या शाळेत वेजिटेबल डे होता …. आणि पोरांना भाज्या करून पाठवायचे होते … डब्यात नव्हे …. मलाच काय आनंद … किती दिवसांनी मला माझे कलागुण दाखवायची संधी मिळाली होती …. लेकीची शाळा बिल्डरकडून घर ताब्यात मिळायच्या घोळामुळे ४-५ महिने चुकली होती आणि त्यात माझे बरेचसे डेज वाया गेले होते …. पण आता मी शांत बसणार नाही …. माझी कला मला बोलावते आहे …. "मग रोज जेवणात काय असते," इति नवरा … खर तर हा प्राणी दिवसा घरात असण्याची शक्यता नसते पण …. गेले दोन दिवस माझा सासुरवास चालू आहे ….

फार लवकर करायला नको …. नाही तर चिरलेली भाजी शाळेत घेऊन जावी लागेल असा सुज्ञ विचार कधी नव्हे ते डोक्यात आला ……. पण विचार तर केलाच हवा …. बटाटा करावा काय कि टोमाटो …. कारले छान आहे ऑप्शन, पण करणार कसे यात जर कला फिरायला गेली …. च्या आयला …. यापेक्षा खरी भाजी करून डब्यात घालून पाठवावी असा विचार आलाच पण … मी त्याला हाकलून लावून कलेवर (माझ्यातल्या ) विश्वास ठेवला … बरच ब्रेन स्ट्रोमिंग झाल्यावर आठवले वांगे …. मग मी फिक्स चल आता वान्गेच करावे ….

आदल्यादिवशी रंगीत कागद , कार्डशिट असे सगळे गोल केले व लेक झोपली असल्याचा मुहूर्त साधून वांगे करायला घेतले …. काळ वेळचे भान हरपल्यामुळे लेक उठली व तिच्यासाठी वांग्याचा बेत लांबणीवर टाकून वरण भात केला… मग एका छोट्या लढाई नंतर तो संपला … चलो वांगे बुला रहे है…!!!

अथक परिश्रमानंतर एक वांगे तयार झाले व एक वांग्याच्या (राजकन्येला) मुकुट पण …. चला आता हे प्रकरण उद्यापर्यंत सांभाळून शाळेत गेले कि वांगे भांड्यात पडले …. अबब आय मीन टु  से जीव भांड्यात ….

सकाळी लेकीच्या गळ्यात वांगे अडकवून, डोक्यावर मुकुट घालून गाडी काढली आणि कसे बसे गेट पर्यंत गेलो … तोपर्यंत वांग्याचा बेल्ट तुटला …. चल परत ३ पार्किंग ला , तीन मजले  असे सगळे करत घरी आलो , गडबडीत चीकटवणार  कुठे म्हणून स्टेपलरचा शोर्टकट मारला परत वांग्याची वरात गाडीवर….
शाळेत पोहोचवले … कधीही शांत न बसणारी लेक फोटोला अगदी व्यवस्थित थांबली … असे पाहून अस्मादिकांची गाडी परत घरला….

तोवर नवरोबाचे वांगे झाले होते म्हणून तातडीने दवाखान्यात गेलो … पण आमच्या इतकी तातडी त्यांना नसल्याने १-१.५ तास कळवळत वाट पाहिल्यावर डॉक्टर साहेब आले …. आमच्या साहेबाना पडद्याआड नेले … हम्म काय होतंय …. पोटात दुखतंय … कळ येते का सलग दुखते …. आआ …. ( कदाचित डॉक्टरांनी दुखरी नस पकडली होती )  … अजून काही असे संवाद करून दोघेही बाहेर आले…. चला अडमीट व्हावे लागेल…. ऑ … लगेच …. हो अर्जेंट आहे … अपेंडिक्स आहे आणि पिकला आहे … लगेच ऑपरेट करावे लागेल …. मला सगळे आठवत होते… सासू सासरे गावाला चालले आहेत …. लेक शाळेत … हेल्थ इन्शुरन्स…. साहेबंचे ऑफिस…घाबरले म्हणण्यापेक्षा निकड जाणवली लगबग करण्याची …. वॉर फुटिंग वर कामे ….  अजून होतो तिथेच होतो …. म्हणजे डॉक च्या केबिन मध्ये ….  इतका वेळ का  दाखवायला यायला … तुमचे ऑपरेशन खरतर २४ तासांच्या आधी व्हायला हवे होते …. मी…  आम्ही गारेगार…

कॅजूअल्टीला अडमीट करा….  मी लेटर देतो … सोनोग्राफी करा … रक्त लघवी तपासा …. असे सगळे कामे ओळीने होती तसेच  हेल्थ इन्शुरन्सचे बघा हेही एक महत्वाचे काम होते …. नवर्याला कॅजूअल्टीला सोडून तिथले सह्या व इतर गोष्टी करत इन्शुरन्सच्या लाडकीला भेटले … एक लिस्ट आणि हि हि कागदपत्रे झेरोक्स असे घेऊन मी नवर्याला सोनोग्राफीला सोडून झेरोक्स साठी बाहेर …. इतकी काळजी वाटत होती त्याची … पण मला त्याच्या बरोबर राहता येत नव्हते … बिचारा दुखाण्यातही बर्याचश्या टेस्टन एकटाच सामोरे जात होता …. ११ वाजले घरी फोन केला सासूबाई ना  सांगितले … लेकीला आणायला … तोवर सासरे गेले होते गावाला … परत दानाख्याची लढाई सुरु २ चा मुहूर्त निश्चित झाला… त्याआधी सगळे करणे गरजेचे होते …. शेवटी इन्शुरन्सची वाट न पाहता पैसे भरले आणि आता नाहीच आले अप्रोवल तर नंतर क्लेम करू असा विचार केला … आणि नवर्याला गाठले…. चाकाच्या खुर्चीवर बसून त्याला नेताना पाहून पोटात गलबलले एकदम …. कायम घट्ट पर्वतासारखा बघून सवय, उगाच डोळे भरून आले…. शेवटी २ वाजले … ओटी चा दिवा लागला आणि माझ्या अस्वस्थ फेर्या सुरु …. तोवर लेक आणि सासू बाई आल्या… एक नणंद आली …. एका डॉक्टर नणंदेचा फोन आला कि मी निघाले आहे… संध्याकाळी पोहोचेन …. त्यामुळे एकटे पण संपले … धावपळ  तर आधीच संपलीच होती… आता फक्त काळजी करायची होती ….

लेकीने आल्या आल्या सांगितले …. आई आई , आपले वांगे मिसनी दिलेच नाही …. शाळेतच ठेवले … :-(
तीच समजूत घालून मी काचेच्या भागातून आत बघत होते …

Sunday 24 May 2015

लाडू

लाडू

लाडू लिहिल्यावर मला उगाचच लाडवाचे जेवण आठवले …. आणि कारण हि …. नातू झाला …. मुलगीला जिलेबी किंवा बर्फी आणि मुलाला लाडू हे असे का …?

याचे लॉजिकल कारण काही सापडत नाही…. फक्त तो लाडू म्हणून मुलगा आणि ती बर्फी म्हणून मुलगी हे जर पचायला जडच आहे …. असो …. त्या २६ जानेवारीला मला जिलेबी हवीच होती आणि मला मिळाली नाही…. पण दोन दिवसात लेक मात्र हातात मिळाली …. "बघ जिलेबी हवी होती न आता मिळाली न जिलेबी "

अरे हा राँग वे आहे …. मला लाडू बद्दल लिहियाचे आहे …. चला नीट लायनीवर येउ…. परवा दिवसभर बादलीने घाम गाळून …. बेदम काम करून ….  आल्यावर नेहमी प्रमाणे किचनच्या लढाईत एक डबा हळूच बाहेर आला …. उघडला तर छोटे छोटे रवा लाडू… मला वाटले कोणी दिलेलेच आहेत म्हणून जर घरी चौकशी केली तर कळले कि ते घरीच बनलेले होते …. राजकन्येला खाण्यासाठी …

अचानक मला पुरानी यादोंका Attack आला … मन पार भुर्र्रर्र उडून बालपणात गेले …. घरी मी आणि माझे वडील असे दोघेच असल्याने ते मला रव्याचे लाडू करून ठेवत …. आणि त्यांना जर बाहेर कामाला जायचे असल्यास मी , लाडू आणि माझ्या पुस्तकांचा ढीग असे सगळे आत आणि बाहेरूक कुलूप लावून बाबा कामाला निघून जात … खादडायला आणि वाचायला असल्यावर मला काही जास्त लागत नसे …

तर सांगायचे हे होते …. बाबा फार मजेशीर लाडू करत … मला फारच कष्ट पडले त्यांच्या कडून लाडू घटवून घेताना…. पहिले पहिले केलेले लाडू मला दोन्ही हातात मिळून एक धरावा लागे … आणि एका लाडवात मी गार …. नंतर एकदा परत लाडू झाले …. त्याचे काय चुकले माहित नाही पण मी ते बशीत घेऊन चमच्याने खाल्ले …. एकदा त्याला मुरु न देता खाल्यामुळे ते फारच कचकचीत लागले …. एका गणपती मध्ये आमच्या गणपतीला नैवेद्याला मला लाडू हवे होते म्हणून ते झाले… आम्ही लहानपणी मित्रांनी मिळून मंडळ केले होते … अजून ते गणपती मंडळ सुरु आहे  … पण पुन्हा पाक रुसून पुढे गेल्याने चुरा वाटला गेला …. नेक्स्ट इअर मी ठरवले लाडू बिदू काय नाही … मला मोदक पाहिजेत …बाबांनी मला हर तर्हेने समजावले कि त्यांना मोदक करता येणार नाही पण मी फिक्स ….  मग ते कंटाळून बाजारात गेले आणि संध्याकाळी मोदक तयार …. मी जम खुश झाकण उघडून पाहिले तर बाबांनी एक लहान मोदकाचा साचा आणून त्यातून रव्याच्या लाडवाचे मोदक पाडले होते…. वाह ….  काय मस्त झाले होते ….  तरीही माझ्या हट्टामुळे नंतर कधीतरी मोदक केले पण मोदक चेन्डूसारखे दिसत होते …. आम्हाला काही त्याच्या काळ्या पडायला आल्या नाहीत …. लाडवाच्या साथीत काढलेले दिवस आठवतात आणि रात्रीही ….

आज नाही वाटत इतके छान लाडू …. खाऊन कंटाळा आला म्हणून … नाही बाबांची चव नाही त्यात …. प्रेम, वाटणारी काळजी सगळे ओतून केलेले ते लाडू कोणत्याही इतर लाडवाहून अतिशय चविष्ट लागायचे ….  

Friday 15 May 2015

लाडकी लेक

 माझी लेक …


जवळजवळ ३ वर्षापूर्वी सिस्टर ने एक मऊ कापडात गुंडाळलेल कौतुक माझ्या हातात आणून ठेवला, तिने हळूच डोळे जर किलकिले केले आणि छोटीशी स्माईल दिली अन बाईसाहेब पुन्हा गुडूप ,  जसे काही आता मी खूप दमले आहे नंतर बोलूया….

तेंव्हा पासून माझी लेक माझे आयुष्य आहे …. सध्या वयवर्षे ३…. ती यायच्या आधी असे वाटलेच नव्हत कि मी कुणावर इतके प्रेम करू शकेन ….

आता चांगले तोंड फुटलेल्या माझ्या लेकीचे एक एक डायलॉग ऐकण्यासारखे असतात ( अगदी तोंडावर फेकून मारते आमच्या )

परवा तिला गुलाब सरबत घालून दुध हवे होते पण मी चुकून चोकलेट मिल्क केले, रुसली आणि थेट देवघरात स्वारी आणि म्हणतीये " देवबाप्पा आता मी काय करू सांग रे , आईने मला गुलाबाचे दुदु दिलेच नाही , मला खूप भूक लागलीये रे …. देवबाप्पा आता तूच संग मी काय करू….  :-O

परवा खेळून आल्यावर पाणी पिली, आणि डायलॉग " आहा आता कस गार वाटतंय पोटात….

आमचे घर तिसर्या मजल्यावर आहे आणि अजून लिफ्ट सुरु झाली नाहीये… पहिले काही दिवस माझी सखू उद्या मारायला शिकली होती त्यामुळे मस्त जिने चढले उतरले जात होते … नंतर एक दिवस तिला शाळेतून घेऊन आल्यावर तिने जिना चढायला स्वच्छ नकार दिला … आई अग माझे गुडघे दुकतायेत… जरा पित्ताची गोळी देशील काय ….

 फार कामे करावी लागतात मला…. बाबाना सूप करायचे आहे ….मला जर नूडल्स करते….
एकदा आजीच्या हातून एक सॉय सॉस ची बोतल पडली, जीवंत राहिली…. हिने लगबगीने  जाऊन उचलली … आपल्याला लागतात न नूडल्स खायला मग ….

मैत्रीण खेळायला आल्यावर तिचा bday असे हिनेच ठरवून केक केला( लुटूपुटुचा ) त्याला कुलर मध्ये
(तिचा तो ओवन आहे ) भाजला … आणि हिने गाणे म्हणून कापला आणि खाल्ला पण… मैत्रीण बघतीये तोंडाकडे….   

एकदा माझा मूड खूपच खराब होता, तिला कसे कळले कोणास ठाऊक, आई तुला बर वाटत नाहीये का, थांब मी तुझे डोके दाबते…

देवाची दुपाची बरणी घेऊन आल्या बाई , चमचा वर काढून मला म्हणाली, "आई नाकात तूप घालायचेय, मी  घालून देते, वैद्य बाई  म्हणाल्या नको नाक दे तुझे….

तिचा बाबा तिचा हिरो आहे, त्याच्या ऑफिसमधल्या तमाम गोष्टी तो दुरुस्त करतो असे तिला वाटते, मग मीही तिला एक एखादी बाबाची गोष्ट सांगते, ज्यात तो ऑफिसमधली खराब झालेली एखादी गोष्ट नीट दुरुस्त करतो……  आणि आमचे फायनल एम झोपणे हे असल्यामुळे दुरुस्ती झाल्यावर सगळे झोपतात प्रत्येक गोष्टीत,
एक दिवस हिने विचारलेच … आई ऑफिस मध्ये झोपतातच काय…? O:-)

आता बोला…. शाळेतल्या मिसला जाऊन सांगितलं, तुम्ही माझा किती छान अभ्यास घेता, मी आईला रोज सांगते कि मिस माझा अभ्यास घेतात तुला येत नाही, तरी ती माझे ऐकत नाही … परेन्ट मिटिंग ला चावायला विषय तिला (मिसला )….

पण लेकी असतातच प्रेमळ… मागच्या गौरी गणपतीला मी नैवेद्य करत होते, पुरणाचा घाट…त्यामुळे सकाळ पासून तिच्याकडे पाहणे झालेच नव्हते , तिला खायला आणि खेळायला एक चीरमुरयाची पिशवी दिली होती, १२-१२. ३० ला जर सगळे आटपत आल्यावर दुडक्या चालीने पिल्लू हळूच आली आणि मला तिच्या पिशवीतले चिरमुरे भरवले …. डोळ्यात असा भाव कि आई तुला भूक लागली असेल न….
खरच माझी आई मला त्यावेळी भेटली …  

Wednesday 13 May 2015

मे - MAY

मे - MAY

खरतर मी महिना सुरु होऊन हि जवळजवळ १५ दिवस होत आले आहेत, तुमच्या आंब्यांनी भरलेल्या मनात हे येण साहजिक आहे …. आता हि बया काय सांगतीये….

आम्हाला एप्रिल संपला काय आणि मे सुरु झाला काय हे फक्त एका गोष्टी वरून कळायचे :-)

अर्थात १ मे रिझल्ट चा दिवस, यानंतर आम्हाला काय रान मोकळेच…. मी, माझे बालपण, मित्र मैत्रिणी  सगळे शहरात वाढलेले, आणि गावाशी फारसा संबध नसलेले त्यामुळे माझ्या लहानपणी सूरपारंब्या आणि शेतातली सफर, आंब्याच्या झाडावर बसून खाल्लेले आंबे, शेतातल्या ओढ्यात किंवा विहिरीत मारलेल्या उड्या, शेतातल्या घरातील चांदण्याच्या रात्री, मामा चा गाव, असे काही काही नाही त्यामुळे वाचकांची घोर निराशा कदाचित माझ्यामुळे होऊ शकेल…. पण मी तर काय करू :-(

नाही म्हनायला माझे बाबा मला उन्हाळ्यात रोज नदीला पोहायला घेऊन जायचे, ते एकदम पट्टीचे पोहणारे असले तरी त्यांनी माझापाठीचा डबा कधीच काढला नाही त्यामुळे मला फक्त काठावर बसून डुंबायला येते

 सध्या तरी मी एकाच मे महिन्याबद्दल सांगेन ,माझ्या लहानपणी गल्लीतील आम्ही जवळजवळ २५-३० जण एकाच वयाची होतो, मस्त ग्रुप  होता ( घरातल्यांच्या भाषेत सांगायचे तर टोळी ), आणि त्यातही डोक्याने सुपीक असलेल्यांची बिलकुल कमतरता नसल्याने रोज एक नवीन पिक आमच्या डोक्यात असायचे,

मला लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड, त्यामुळे माझ्या डोक्यातील एक पिक, आपण लायब्ररी सुरु करू, सर्वांनी अतिशय दणाणून प्रतिसाद दिल्याने एका दिवसात गल्लीत किमान ४-५ तरी लायब्रर्या सुरु झाल्या… ५ रुपये डीपोझीट आणि महिना २ रु भाडे ( अरे हे तर घर भाड्याने घेतोय असे वाटतंय ) … खुन्नस पार्टीकडे जायचे नाही, माझ्याकडेच यायचे अशा गोड हट्टामुळे बरीच पुस्तके इकडची तिकडे झाल्यावर आठवड्यात हा कार्यक्रम बंद पडला अर्थात हा फक्त दुपारचा होता

संध्याकाळी आम्ही सारे मिळून लपंडाव खेळायचो, ज्याच्यावर डाव येईल तो २-३ दिवस डावच फेडत असायचा शेवटी रडून झाले कि मग परत नवा गाडी ( काय करणार इतके जण  होतो कि ज्याच्यावर डाव येईल त्याला लक्षातच राहायचे नाही कि कोण आउट आणि कोण नाही) एक दिवस घळसासी काकांचे घराचे बांधकाम चालू होते, तिथे लपलो सगळे आणि काय नशीब नेमके ते तिथे उपटले …. पोरांना अगदी सांगता येत नाही अशा ठिकाणी फटके लावले आणि आम्हाला खास घरी नेउन पोहोचवण्यात आले… मग काय घरी आरतीच ….

आता दुपारी काय करायचे अशा अडचणीतून एका मैत्रिणीने वाट काढली, आपण ग्रीटिंग कार्ड्स तयार करूया, आणि विकूया… चल सगळी झुल्लड परत खरेदीला… कार्ड लवकर करायच्या गडबडीत रंग ओले असतानाच काळ्या स्केचपेनने बोर्डर करणे वैगरे घोळ घालून आम्ही एकदाची कार्ड्स तयार केली…. ३-४ दिवस हेही झाले आणि आम्ही चौकात प्रदर्शन भरवले…  पण काय वाईट वाटले माहितीये….कुणीच आले नाही खरेदीला…. कारण तो चौक इतका आत होता कि कोणाला कळणे  केवळ अशक्य होते B-)
शेवटी आम्ही आमच्याच आईबाबाला पकडून आणून त्यांच्या गळ्यात आमची कला मारली

एक दुपारी इमली कॅन्डी करायचे ठरले…. मग काय परत सारे खरेदीला, वर्गणी काढून चिंच पाव किलो घेऊन आलो…. आणि प्रत्येकाकडे एक एक समान वाटले जसे गुळ, तिखट , मीठ , आणि मुख्य बत्ता हे सारे घरातून चोरून आणावे लागे (आपापल्या ) मग एका दुपारी टळटळीत उन्हात सगळ्या स्वार्या तोंडचे पाणी आवारात एकीच्या टेरेसवर भेटल्या…. कदाचित चिंच कुटताना किंवा आम्ही घातलेल्या गोंधळाच्या आवाजाने तिच्या आईला जाग आली आणि आम्ही बत्त्यासकट पळ काढला….

मग संध्याकाळी सायकलिंग चा प्लान ठरला पण सगळ्यांकडे सायकल नसल्याने ती भाड्याने काढावी लागे आणि त्यात पुन्हा संख्या जास्त त्यामुळे जवळपासच्या सगळ्या दुकानात नंबर आमचाच अशी २ तास साधना झाल्यावर एकदाची सायकल हातात मिळायची ती शक्य तेवढ्या फास्ट रंकाल्याकडे दामटायची…(रंकाळा हा आमच्या जवळच्या एका मोठ्या तलावाचे नाव आहे ) त्यावेळी संध्यामठाकडील घाट बांधला नव्हता आणि एक जमिनीचा पट्टा  लांब आतवर पाण्यात गेला होता  तिथे जाऊन गप्पा मारायच्या आणि कोणाकडेही पैसे नसल्याने भेल etc न खाताच गुपचूप मागे यायचे कारण सायकल भाड्याची… भाडे वाढतेय … कदाचित आज पुण्यातील घराचे भाडे वाढल्यावरही इतके वाईट वाटत नाही….

एक दिवस संध्याकाळी भेळेच प्लान ठरला , पुन्हा वर्गणी काढली , आणि असे ठरले कि टोमाटो, कांदा आणि फरसाण हे  घेऊन यायचे मग भेळ मिळेल…. (मग वर्गणी कसली … असे प्रश्न आज पडत आहेत  तेंव्हा काही नाही ) काय मस्त लागली माहिती आहे ती भेळ…. चला तोंडाला पाणी सुटलं ….

एका मैत्रिणीच्या घरी दुपारी व्यापार खेळायला जमलो … अडगळीच्या खोलीत …. आणि खेळ बाजूलाच राहिला आम्ही भुताच्या गोष्टी एकमेकांना सांगत होतो… आणि अचानक एका उंदीर आला आणि मागोमाग एक मांजर पण आणि आम्ही सगळ्या भर दुपारी सगळ्यांची झोपमोड केली … मग आमचे काय झाले हे सांगण्यासारखे नाही…

अजून मे महिन्यातले सिनेमे, रात्रीचे badminton , कट्ट्यावरच्या गप्पा , एक दिवसाची ट्रीप, कुत्री मांजरे पाळणे , अभ्यासाचा प्लान तयार करणे , हे आणि असे अजून चिक्कार उद्योग आम्ही केलेले आहेत त्यामुळे आज माझ्या मुलीला हे सगळे सांगताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायला मला खूप आवडतात …. तिला सगळे परीकथेसारखे वाटत असते …. आणि मी जुने क्षण परत जगून घेते ….

 






Tuesday 5 May 2015

सखी-२

सखी-२

सखी ची आई जायच्या काही दिवस आधी बाबांनी सखीचे केस कापून आणले होते, कायम स्वःताला लांब वेण्यात पहायची सवय, आरश्यात बघून सखी खूप रडली होती. आई पण रडली पण कदाचित तिचे जाणे दोघांच्या लक्षात आले होते, पण सखी …?

दुपारी शेजारच्या काकू आल्या, आईची चौकशी करायला. सखीला परत उमाळा फुटला, काकुंचेही डोळे पाणावले. दुसऱ्या दिवशी मात्र शाळेत जायला सखी बिलकुल तयार नव्हती. बाबांनी कशी बशी समजूत घालून तिला पाठवले, तशीच ती शाळेत गेली, तिच्या जागेवर बसायला जात असताना हळूच मागच्या मुली कुजबुजल्या. ए  घरी वारले न कि केस कापतात न… मला माहित आहे… सखी पुन्हा…. मनात प्रश्न वारणे म्हणजे ??

सगळच खूप विचित्र आणि तिच्या बालमनाला यातना देणारं…. आई गेल्यानंतर नदीवरचे कार्यासाठी सखीची ताई आणि ती सगळ्यांबरोबर गेल्या होत्या, एका झाडाखाली उभे असताना ताई  एकदम म्हणाली "ते बघ काका आला " अरे आता हे काय …? बाबांचे का टक्कल केलंय…. त्यांचे केस कुठे आई विन्चारायची त्यांचे त्यांना येतात कि. आणि मला खूप आवडतात त्यांचे केस विंचरायला पण टक्कल ???

कोणाच्या लक्षात आले असेल अथवा नसेल पण सखी आई गेल्यावर रडलीच नव्हती …. कस पेललं तिने हे सारे या वयात …. कोणतीही चिडचिड न करता .... तिला कदाचित या घटनेचा परिणाम लक्षात आला नव्हता आणि येण्याचे तिचे वयही नव्हते….

सगळे कार्यक्रम आटोपल्यावर सखी आणि तिचे बाबा घरी गेले….

घरात एक कुंद धुक्यासारखे वातावरण

बाबा…. मला खूप भूक लागली आहे, खाऊ द्या न….

बस बाळ, मी तुझ्यासाठी शिरा करतो…

बाबांनी  दिलेला शिरा खाऊन पेंगळून सखी तिथेच पाटावर झोपून गेली….

बाबांना हे बघून खूप भरून आले…. उगाचच भास झाला घरातले कुंद धुके कमी होतंय …. जसं काही सखीची आई तिची काळजी  करत थांबली होती आणि आता बाबा छान काळजी घेत आहेत हे लक्षात आल्यावर  हळू हळू ती निघून गेली

बाबा तसेच सखीच्या अंगावरून आईच्या किंवा कदाचित जास्तच मायेने हात फिरवत राहिले….